द्राक्ष व्यवस्थापन व रोग नियंत्रण

रोग नियंत्रणासाठी दीर्घकालीन सूत्रे पाहण्यापूर्वी त्यामागील उद्देश लक्षात घेतले पाहिजेत. 
1) प्रभावी रोग नियंत्रण. 
2) अतिविषारी पदार्थांचा किमान वापर, तर कमी विषारी किंवा बिनविषारी पदार्थांचा अधिक वापर. 
3) बुरशीनाशकाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झालेल्या रोगकारक बुरशींच्या वाढीसाठी संधी न देणे किंवा किमान संधी देणे. 
4) वापरलेल्या सर्व बुरशीनाशकांचे उर्वरित अंश काढणीच्या वेळेपर्यंत एमआरएलपेक्षा कमी राहिले पाहिजेत. 

रोग नियंत्रणासाठीचे काही टप्पे... 
- फळछाटणीनंतरच्या पहिल्या 50 दिवसांत रोगापासून नुकसानीचा सर्वाधिक धोका असतो. साधारणपणे फलधारणेनंतर रोगांचा धोका कमी असला, तरी उर्वरित अंशाच्या दृष्टिकोनातून बुरशीनाशकांच्या वापरावर मर्यादा येतात. 
- सुरवातीच्या काळात कॅनॉपी वाढीच्या अवस्थेत असल्याने पुन्हा-पुन्हा फवारण्या घ्याव्या लागतात. फलधारणेनंतर कॅनॉपीची वाढ थांबते. मात्र, कॅनॉपी दाट असल्यास आतील भागापर्यंत फवारणीचे कव्हरेज चांगल्या प्रकारे होऊ शकत नाही. म्हणूनच फळधारणेनंतर चांगल्या "कव्हरेज'कडे लक्ष देणे अत्यंत आवश्‍यक असते. 
- मण्यात पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर वास्तविक पाहता रोग महत्त्वाचे नसतात; परंतु आधीच्या काळातील उपाययोजनेवर त्यांचे स्वरूप अवलंबून असते. म्हणूनच मण्यात पाणी भरल्यानंतर रोग येऊ नयेत, यासाठी मण्यात पाणी भरण्यापूर्वीपासूनच काळजी घेतली पाहिजे. 

छाटणीनंतरचे पहिले 25 दिवस ः 
- हा कोवळी पाने वाढण्याचा काळ असतो. या वेळी पहिल्या पाच कोवळ्या पानांवर करपा किंवा केवडा रोग येण्याचा धोका असतो. सकाळच्या वेळी धुके, दव पडल्यास अथवा पाऊस झाल्यास रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे छाटल्यानंतर व फुटण्याआधी बोर्डो मिश्रण अर्धा टक्के किंवा कॉपर हायड्रॉक्‍साईड 1.5 ते 2.0 ग्रॅम प्रतिलिटर यापैकी ताम्रयुक्त बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. बागेमधील रोगकारक बिजाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. 

पहिल्या तीन पानी अवस्थेसाठी... 
- बाग पोंगा अवस्थेपासून पहिल्या तीन पानी अवस्थेपर्यंत असताना, पाऊस किंवा जास्त प्रमाणात धुके पडून दव पडत असल्यास बागेमध्ये मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) 2.5 किलो प्रतिएकर याप्रमाणे धुरळणी करावी. धुरळणी केल्यास बुरशीनाशके कोवळ्या फुटीवर चिकटून त्यावरील पाण्यामुळे आतपर्यंत पसरतात. रोगांपासून चांगले संरक्षण मिळते. या वेळेस फवारणी केल्यास चांगले कव्हरेज मिळत नाही. धुरळणीची शिफारस सुरवातीच्या फुटी वाढत असताना पावसाळी वातावरण असेल, तरच केली आहे. नंतरच्या अवस्थेमध्ये धुरळणी पुन्हा- पुन्हा करणे टाळावे. 
- सुदैवाने पोंगा स्टेजमध्ये दव किंवा पाऊस नसल्यास, सुरवातीच्या फवारण्या कमी किंवा हात आवरूनच कराव्यात. छोटी 2 ते 3 पाने बऱ्यापैकी उमललेली असताना केलेल्या फवारण्या जास्त उपयुक्त ठरतात. त्यामुळे 2-3 पाने उमलल्यानंतर ते 5 पाने वाढेपर्यंतच्या काळात डाऊनीच्या नियंत्रणासाठी कमी धोक्‍याच्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाच्या दोन फवारण्या घ्याव्यात. डायमिथोमार्फ 1 ग्रॅम प्रतिलिटर किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रोपीनेब 2.5 ग्रॅम प्रतिलिटर किंवा मॅन्डिप्रोपॅमीड 0.75 ग्रॅम प्रतिलिटर या वेळी फवारण्यास वापरावे. डायमिथोमार्फ किंवा मॅन्डिप्रोपामीड वापरताना त्यासोबत मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रतिलिटर मिसळून फवारल्यास बागेत बुरशीनाशकाच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती असलेली केवडा बुरशी वाढण्यास आळा बसू शकतो. 

7 पानी अवस्थेपासून फुलोऱ्यापर्यंत फवारण्याची संख्या कमी ठेवावी ः 
बागेच्या उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांत महत्त्वाची अवस्था असून, या वेळी केवडा रोगाबरोबरच बागेत फूलगळ, घडकूज होते. अर्थात, गळ किंवा घडकूज मागे जरुरीपेक्षा जास्त केलेल्या फवारण्याच कारणीभूत ठरत असल्याचे आमचे मत आहे. म्हणूनच या काळात योग्य व मोजक्‍या फवारण्या कराव्यात. 
- घडाची लांबी वाढावी म्हणून दिल्या जाणाऱ्या जीए 3 ची फवारणी किंवा डिपींग, झिंक, बोरॉन, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम या बरोबरच थ्रिप्ससाठीच्या फवारण्या याच वेळेस दिल्या जातात. सात पानांपासून फुलोऱ्यामध्ये येईपर्यंत ऑक्‍टोबरच्या छाटणीनंतर 10 दिवस लागतात. थोडी उशिरा छाटणी झालेली असल्यास थंडीमुळे हे दिवस वाढतात. या दिवसातील फवारण्या कमी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. 
- घड नाजूक असून त्यातही सोनाका किंवा माणिक चमन या जातीमध्ये तो अत्यंत नाजूक असतो. या वेळी जास्त फवारण्या, एकापेक्षा अधिक रसायने मिसळून केलेल्या फवारण्या घडांना सहन होत नाहीत. त्यामुळे सातत्याने निरीक्षण करून कोणत्या उपाययोजनेची अधिक आवश्‍यकता आहे, हे समजून घेऊन तेवढ्याच एका रसायनाची फवारणी घ्यावी. उदा. पाऊस किंवा दव जास्त असलेल्या काळात डाऊनीचा धोका अधिक असतो. अशा वेळी कीटकनाशकाच्या फवारण्या टाळता येतील. त्यातही लो व्हॉल्यूम इलेक्‍ट्रोस्टॅटिक फवारणी यंत्राने केलेल्या फवारण्यात कॅनॉपीमध्ये पाणी कमी प्रमाणात जाते. त्याचा घडांना फायदा होतो. 
- केवड्यासाठी
वापरली जाणारी आंतरप्रवाही बुरशीनाशके कोवळ्या पानांद्वारे चांगल्या प्रकारे आंतरप्रवाहित होतात. म्हणूनच या वेळी त्यांचा वापर अधिक फायदेशीर ठरतो. मात्र, अनेक्‍श्चर 5 मधील कमी धोक्‍याच्या बुरशीनाशकामध्ये अन्य कीटकनाशके किंवा अन्नद्रव्ये न मिसळता फवारणी करावी. कारण कीटकनाशके व अन्नद्रव्ये ही बुरशीनाशकांच्या तुलनेमध्ये जास्त प्रभावीपणे आंतरप्रवाही होऊ शकतात. म्हणून त्यांच्यासह मिसळून बुरशीनाशके वापरल्यास बुरशीनाशक कमी प्रमाणात आंतरप्रवाही होते. बुरशीनाशकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. 
- सुरवातीपासूनच डाय थायो कार्बामेट जातीची बुरशीनाशके म्हणजेच मॅन्कोझेब, प्रॉपीनेब इत्यादी आपण फवारत असतो. त्यातून झिंक, मॅंगनीज, सल्फर यासारखी अन्नद्रव्ये वेलींना मिळत असतात. म्हणून या काळात अन्नद्रव्यांच्या फवारण्या टाळणे शक्‍य होऊ शकेल. 
- रॅचिस लांबल्यानंतर फॉस्फोनेट वर्गातील रसायनांचा वापर डाऊनीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त होऊ शकेल. फोसेटील एएल. 30 ग्रॅम प्रतिलिटर किंवा फॉस्फरस ऍसिडचे पोटॅशिअम सॉल्ट 2 ते 4 ग्रॅम प्रतिलिटर फवारल्यास डाऊनीचे नियंत्रण मिळू शकेल. या फवारणीमध्ये मॅन्कोझेब किंवा प्रॉपीनेब 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात मिसळून फवारल्यास केवड्याचे नियंत्रण अधिक चांगले मिळेल. 
- सर्वसाधारणपणे पाऊस किंवा अधिक दव असताना डाऊनीच्या नियंत्रणासाठी वापरलेली कमी धोक्‍याची बुरशीनाशके चांगल्या प्रकारे आंतरप्रवाही होत नाहीत. त्यामुळे अशी स्थिती असल्यास लवकर व चांगल्या प्रकारे आंतरप्रवाही होणाऱ्या फॉस्फरस वर्गातील बुरशीनाशकांना प्राधान्य द्यावे. त्याचप्रमाणे ही बुरशीनाशके पानावर आम्लधर्मीय वातावरण तयार करतात, त्यामुळे बागेत फवारलेल्या जीए3 चे शोषणही चांगल्या प्रकारे होऊन त्याचे चांगले परिणाम मिळतात. 
- काही शेतकरी फॉस्फेट व फॉस्फोनेट यामध्ये शेतकरी गोंधळ करतात. त्यातील फरक नेमका समजून घ्यावा. फॉस्फेट हे खत असून, त्यामधून पालाश (P2O5) मिळू शकते. फॉस्फेटने डाऊनी नियंत्रण होऊ शकत नाही. फॉस्फोनेटचा उपयोग डाऊनीच्या नियंत्रणासाठी होतो. फॉस्फोनेटमधून पालाश मिळू शकत नसल्याने त्याचा खत म्हणून काही उपयोग नाही. फॉस्फरिक ऍसिड हे खत म्हणून उपयुक्त आहे; पण त्याने डाऊनीचे नियंत्रण मिळत नाही. मात्र, पोटॅशिअम फॉस्फोनेट किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिड हे फॉस्फोनेट (फॉस्फाइट) वर्गातील आहेत. त्यांचा डाऊनी नियंत्रणासाठी उपयोग होतो. 
- फॉस्फाइट जातीतील बुरशीनाशके बाह्यस्पर्शी बुरशीनाशकांबरोबर मिसळून वापरणे आवश्‍यक असते. सध्या फोसेटील-एएल व फ्युपीकोलाईड या बाह्यस्पर्शी बुरशीनाशकाचे मिश्र फॉर्म्युलेशन उपलब्ध आहे. त्याचा वापर फुलोऱ्याच्या अवस्थेत डाऊनीच्या नियंत्रणाखाली उपयुक्त ठरेल. 
- फॉस्फाइट जातीतील रसायने डाय थायोकार्बामेट वर्गातील बुरशीनाशकांबरोबर मिसळून वापरल्यास, म्हणजेच मॅन्कोझेब, प्रोपीनेबबरोबर वापरल्यास डाऊनीचे नियंत्रण चांगले मिळते. मात्र, फॉस्फाइटबरोबर कॉपर हायड्रॉक्‍साईड मिसळून वापरल्यानंतर अपेक्षित नियंत्रण मिळाले नाही, असे आमच्या प्रयोगात आढळले आहे. 

फुलोऱ्यापासून फुलधारणेपर्यंत 
घड फुलोऱ्यात असताना जास्त दव किंवा हलका पाऊस झाल्यास घडकूज मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते. त्याच प्रमाणे घड वाढीच्या सुरवातीच्या काळात वेगवेगळ्या रसायनांच्या भरपूर फवारण्या केल्या जातात. या अतिफवारण्यांमुळे गळ वाढते. म्हणून अनावश्‍यक व एकापेक्षा अधिक वेगवेगळी रसायने मिसळून फवारणे कटाक्षाने टाळावे. 
- घड फुलोऱ्यात येण्यास सुरवात झाली, की घडात पाणी जास्त प्रमाणात व जास्त वेळ राहते. या पाण्यामुळे कूज वाढते. पाणी जास्त वेळ राहिल्याने डाऊनीचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते. घडावर पाणी जास्त वेळ राहू नये, याकरिता फुलोरा सुरू होण्याच्या काळात 1.5 ते 2 मिली स्प्रे ऑइल प्रतिलिटरप्रमाणे बागेत फवारावे. सकाळी तारा हलवल्यास घडात राहिलेले पाणी ऑइलमुळे लवकर झटकले जात असल्याचे लक्षात आले आहे. मात्र, स्प्रे ऑइल वापरण्यापूर्वी घडांवर ताम्रयुक्त बुरशीनाशके व सल्फर फवारलेले नाही, याची खात्री करून घ्यावी. अन्यथा विषारीपणा (टॉक्‍सिसिटी) निर्माण होऊ शकेल. 

- बागेतील चांगले डाऊनी नियंत्रण हे गळ व घडकूज कमी करण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. फुलोऱ्यात दिलेल्या फॉस्फाइटच्या फवारण्या उपयोगी आहेतच. त्याव्यतिरिक्त पाऊस किंवा दव अपेक्षित असल्यास, फुलोरा सुरू होताच कमी धोक्‍याची आंतरप्रवाही बुरशीनाशकांची (उदा. डायमिथोमॉर्फ 1 ग्रॅम प्रतिलिटर किंवा इप्रोव्हॅलिकार्ब अधिक प्रोपीनेब 3 ग्रॅम प्रतिलिटर किंवा मॅन्डिप्रोपामिड 0.75 मिली प्रतिलिटर) फवारणी दिल्यास घडावरील डाऊनी नियंत्रित होऊ शकेल. 
- घड फुलोऱ्यात असताना व्हिगर (म्हणजेच जोम किंवा फुटीच्या वाढींचा वेग) किमान असणे अत्यंत जरुरी आहे. यासाठी या काळात नत्राचा उपयोग कमीत कमी करावा; तसेच फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनात नत्र अथवा ऍमिनो ऍसिड नसल्याची खात्
री करावी. फुलोऱ्याच्या काळात जोम जास्त झाल्यास डाऊनी व अन्य सर्वच समस्या उद्‌भवणार, हे लक्षात घ्या. 
- फुलोऱ्यानंतर फलधारणा होईपर्यंत दव किंवा पाऊस नसल्यास बागेत भुरी वाढण्यास सुरवात होते. तिचे नियंत्रण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण एकदा भुरी बागेत वाढली तर तिचे नियंत्रण करणे अवघड होते. किंबहुना काढणीच्या आधी देठावरती दिसणारी भुरी ही फुलोऱ्यानंतर ते फलधारणेपर्यंतच्या काळात घडावर शिरलेली असते. या काळात भुरी नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक (हेक्‍झाकोनॅझॉल 1 मिली प्रतिलिटर किंवा फ्युसिलॅझोल 25 मिली प्रतिलिटर) फवारणे फायद्याचे होते. फुलोऱ्यानंतर या बुरशीनाशकांचा वापर वेलीचा जोम कमी करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरतो. 
- फळधारणा होऊन जोंधळ्याच्या आकाराएवढे मणी तयार झाल्यानंतर, बागेत कायटोसॅन (10टक्के ) 2 मिली प्रतिलिटर या प्रमाणात फवारल्यास भुरी नियंत्रणास फायदा होईल. या रसायनाचे सूक्ष्म आवरण पाने व घडांवर तयार होते. त्यामुळे घड व पानांवर पाणी जास्त काळ थांबत नाही. अप्रत्यक्षपणे डाऊनीचे नियंत्रण मिळते. कायटोसॅनमुळे घड व पानांमध्ये फेनॉलिक पदार्थांची निर्मिती होऊन वेलीची आंतरिक प्रतिकारशक्ती वाढते. रोगनियंत्रणास मदत होते. 

घडांची वाढ होताना ते मण्यात पाणी भरेपर्यंत ः 
या काळातही खरे पाहता भुरीचे नियंत्रण अधिक महत्त्वाचे असले तरी अवेळी पावसामुळे काही वेळा डाऊनीच्या नियंत्रणाकडे लक्ष ठेवावे लागते. मणी तयार झाल्यानंतर होणाऱ्या सर्व फवारण्या रेसिड्यूच्या (अवशेष) दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी सावध राहिले पाहिजे. म्हणून या काळात डाऊनी नियंत्रणासाठी फोसेटील एएल किंवा पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरस ऍसिडचाच उपयोग करावा. कारण ही बुरशीनाशके अवशेषाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आहेत. फॉस्फरस ऍसिडच्या पोटॅशिअम सॉल्टमध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत पोटॅश असून, त्याचा अन्नद्रव्य म्हणून व अप्रत्यक्षपणे भुरी नियंत्रणासाठीही फायदा होतो. 
- थंडी कमी असेपर्यंत भुरीच्या नियंत्रणासाठी सल्फरचा वापर करणे आवश्‍यक आहे. थंडी वाढल्यानंतर सल्फर भुरी नियंत्रणाच्या दृष्टीने कमी प्रभावी राहते. फलधारणेनंतर वाढलेल्या कॅनॉपीमध्ये फवारणीचे कव्हरेज चांगले मिळण्यासाठी काडीच्या खालच्या भागातील पाने काढून घ्यावीत अथवा काड्या तारेवर बांधून घेतल्यास कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहते. आर्द्रता कमी होऊन बागेतील रोगासाठी पोषक वातावरण राहत नाही. केलेल्या फवारण्या आतल्या कॅनॉपीपर्यंत पोचून रोग नियंत्रण चांगले मिळते. 
- कॅनॉपी दाट असताना धुरळणी यंत्राने सल्फरची धुरळणी केल्यास भुरीचे चांगले नियंत्रण मिळते. धुरळणीसाठी 5 किलो सल्फर प्रतिएकरी लागते; परंतु कॅनॉपी चांगली विरळ असल्यास सल्फरच्या फवारणीनेसुद्धा भुरीचे नियंत्रण मिळेल. त्यासाठी सल्फर (80 डब्ल्यूजी) 1.5 ते 2 ग्रॅम प्रतिलिटर प्रमाणे फवारल्यास भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. सल्फरमुळे बागेमधील लाल कोळीचे नियंत्रण होते. 
- फळधारणेनंतर लगेच शेंडा थांबतो. अशा वेळी म्हणजेच छाटणीनंतर 50-60 दिवसांत बागेत वाढता शेंडा किंवा कोवळी पाने राहत नाहीत. या वेळेत बागेला डिनोकॅप 25 ते 35 मिली प्रति 100 लिटर या प्रमाणात फवारल्यास भुरीचे नियंत्रण मिळते. 60 दिवसांनंतर डिनोकॅप फवारल्यास रेसिड्यूचा धोका वाढतो. डिनोकॅप बाह्यस्पर्शी बुरशीनाशक असून, बागेमधील ट्रायाझोल बुरशीनाशकाच्या विरुद्ध भुरीमध्ये प्रतिकारशक्ती वाढू न देण्यासाठी डिनोकॅपच्या फवारणीचे विशेष महत्त्व आहे. म्हणून योग्य वेळी त्याचा वापर होणे फायद्याचे आहे. 
- थंडीच्या दिवसांत ट्रायाझोल जातीतील बुरशीनाशकाचा वापर भुरीच्या नियंत्रणासाठी अनिवार्य आहे. फलधारणेनंतर ट्रायाझोल वर्गातील वापरण्यायोग्य बुरशीनाशके खालील क्रमाप्रमाणे वापरणे आवश्‍यक आहे.
1) डायफेनकोनॅझोल (25 इसी) 0.5 मिली प्रतिलिटर (पीएचआय 40 दिवस) 
2) टेट्राकोनॅझोल (3.4 इसी) 0.75 मिली प्रतिलिटर. (पीएचआय 30 दिवस) 
3) मायक्‍लोब्यूटॅनील (100 डब्ल्यू.पी.) 0.4 ग्रॅम प्रतिलिटर.(पीएचआय 30 दिवस) 
भुरीचे नियंत्रण चांगले मिळण्यासाठी या सर्व बुरशीनाशकांचा वापर पोटॅशिअम बायकार्बोनेट 5 ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात मिसळून करावा. 
मात्र, या बुरशीनाशकांचा वापर मण्यात पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर म्हणजेच छाटणीनंतर 90 दिवसांनंतर करू नये. 
- मण्यांची चांगली वाढ झालेली असताना कायटोसॅन (10%) 2 मिली प्रतिलिटर या प्रमाणात फवारल्यास भुरीच्या नियंत्रणास उपयोगी पडते. कायटोसॅनच्या फवारणीआधी ट्रायाझोल वर्गातील बुरशीनाशके अथवा सल्फर वापरले असल्यास त्या बुरशीनाशकांचा प्रभाव जास्त दिवस राहून भुरीचे नियंत्रण चांगले मिळते. 
- मणी वाढल्यानंतर बेदाण्यासाठी असलेल्या द्राक्षांवर (75 ते 80 दिवसानंतर) कायटोसॅन वापरणे योग्य नाही. कारण ते वापरल्यानंतर द्राक्षे लवकर वाळत नाहीत. त्यामुळे बेदाण्याच्या बागेमध्ये त्याऐवजी मिनरल ऑईल स्प्रे 2 मिली प्रतिलिटर प्रमाणे फवारता येईल. या फवारण
ीमुळे भुरी व लाल कोळींचे नियंत्रण चांगले मिळते; तसेच द्राक्ष मण्यांच्या पृष्ठभागावरील मेणाचा थर अस्थिर झाल्याने द्राक्षे लवकर सुकण्यासाठी मदत होईल. बेदाण्याची द्राक्षे जास्त साखर वाढेपर्यंत काढली जात नाहीत. उशिरा उन्हाळ्यामध्ये बेदाण्याच्या द्राक्षावर पिठ्या ढेकूण लवकर वाढू शकतात. अशा पिठ्या ढेकूण व लाल कोळीचे नियंत्रण करण्यासाठीही स्प्रे ऑइलची फवारणी उपयुक्त ठरते. मात्र, या फवारणीआधी 15-20 दिवस सल्फर फवारलेले नसावे. 

मण्यात पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर ः 
- मण्यात पाणी भरण्यास सुरवात होताच मणी सुकणे, घडातील पाकळ्या सुकणे असे प्रकार दिसू लागतात. अशा प्रकारांमध्ये कोणत्याही बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा काहीही संबंध नसतो. 
- सर्वसामान्यपणे घडांच्या वाढीच्या सुरवातीला झालेल्या व बुरशीनाशकांच्या वापराने नियंत्रित झालल्या डाऊनीच्या प्रादुर्भावाचे घड मण्यात पाणी भरण्याच्या कालावधीमध्ये खराब होऊ लागतात. ज्या मण्यांचे देठ अथवा रॅचिस पूर्वीच दुखावलेले आहेत, अशा मण्यामध्ये पाणी भरतेवेळी घडांमध्ये रसायनांचे वहन वाढल्याने समस्या निर्माण होतात. म्हणून असे प्रकार दिसल्यास प्रभावीत घड अथवा पाकळ्या काढून टाकणे, हाच खरा उपाय असतो. 
- बऱ्याच वेळा कॅल्शिअमची मात्रा कमी झाल्याने घड खराब होतात. त्यामुळे मण्यात पाणी भरण्यास सुरवात होण्याच्या भरपूर आधी कॅल्शिअमसुद्धा देणे आवश्‍यक आहे. कारण लक्षणे दिसू लागल्यानंतर ते देऊन फारसा फरक पडत नाही. 
- मण्यात पाणी भरण्यास सुरवात झाल्यानंतर बुरशीनाशकांच्या फवारण्या बंद होतात. अवशेषाच्या धोक्‍यामुळे बुरशीनाशकांच्या फवारण्या शक्‍यही नसते. अशा वेळी भुरीचा प्रादुर्भाव देठावर होण्याची शक्‍यता असते. या भुरीच्या नियंत्रणासाठी व काढणीनंतरचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जैविक नियंत्रण उपयुक्त ठरते. अधिक तापमान व आर्द्रता वाढलेली असल्यास जैविक नियंत्रण यशस्वी होऊ शकते. बॅसिलस सबटीलस अथवा स्युडोमोनास फ्ल्युरोसन्स यासारख्या जिवाणूच्या फवारण्या भुरी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात. त्याचप्रमाणे ट्रायकोडर्माच्या फवारणीमुळेही भुरी नियंत्रण व साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. बागेतील आर्द्रता जास्त असल्यास ट्रायकोडर्मा चांगले काम करते. आर्द्रता तुलनेने कमी असल्यास लाभदायक जिवाणू चांगले काम करतात. 
- मण्यात पाणी भरण्यास सुरवात होताच कायटोसॅनची फवारणी घेतल्यास भुरीचे नियंत्रण चांगले होईल. बॅसिलस सबटीलस किंवा ट्रायकोडर्माचा वापर केल्यावर कायटोसॅनमुळे जैविक नियंत्रणासाठी वापरलेल्या सूक्ष्म जिवांना संरक्षण मिळते; तसेच काढणीनंतरच्या साठवण कालावधीमध्ये वाढ होईल. हलका पाऊस झाल्यास मणी क्रॅक होण्याची संभावना कमी होईल; परंतु कायटोसॅनने मण्यात साखर लवकर भरते व काढणी वेळेवर करणे आवश्‍यक ठरते. अन्यथा मणी जास्त पिकल्यामुळे नरम पडण्याची शक्‍यता असते.
हलका पाऊस अथवा वादळी पाऊस काढणीआधी झाल्यास मण्यात क्रॅकिंग होते. मण्यातून साखर बाहेर आल्यास घडकूज सुरू होते. अशा वेळी बागेतील नुकसान कमी करण्यास खालील बाबी उपयुक्त ठरतील. 
1) मण्यात पाणी भरण्यास सुरवात होताच कायटोसॅन (10%) 2-3 मिली प्रतिलिटर घडावर फवारावे. 
2) घडांवर क्रॅकिंग अथवा कूज किंवा पावसाच्या अथवा गारांच्या दुखापतीमुळे खराब झालेले मणी कात्रीने काढून घ्यावेत. 
3) बागेमध्ये क्‍लोरीन डायऑक्‍साइड (50 पीपीएम ) फवारावे. या फवारणीने कूज लगेच थांबेल. 
4) घडांवर भुरी असल्यास हायड्रोजन पेरॉक्‍साइड हे चांदीबरोबरचे संयुग 2 मिली प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे. 

---------------------------------------------------------------------------------
टीप ः या लेखात नमूद केलेले विचार म्हणजे शिफारशी नाहीत. वेगवेगळी रसायने, जिवाणूजन्य वा बुरशीजन्य घटक यांचा वापर त्यांचे लेबल क्‍लेम पाहून करावा. उपाययोजना सुचविताना रेसिड्यू निगडित धोके राहणार नाहीत, याची काळजी घेतलेली आहे. मात्र लेखक कुठल्याही परिस्थितीत नुकसानीची जबाबदारी स्वीकारणार नाहीत, याची नोंद घ्यावी. 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट