संजिवकांचा वापर आणि काळजी

द्राक्षबागेतील वातावरण, पाणी व अन्नद्रव्ये यांचे योग्य व्यवस्थापन तसेच कीड व रोगमुक्त वेल असल्यास संजीवकांचे योग्य परिणाम दिसून येतात. अन्यथा संजीवकांच्या वापराचा जास्त उपयोग होत नाही. 
द्राक्षांच्या बिया हा मण्यांच्या वाढीसाठी आवश्‍यक संजीवकांचा नैसर्गिक स्रोत असतो. त्यामुळे बिनबियांच्या द्राक्षांमध्ये बाहेरून संजीवकांचा वापर करणे आवश्‍यक असते. यात जीएचा वापर आवश्‍यक झाला आहे. स्थानिक बाजारपेठ निर्यातीसाठीच्या सर्वच द्राक्षांमध्ये ऑक्‍टोबर छाटणीनंतर संजीवकांचा वापर केला जातो. परंतु अलीकडील काळात जीएचा अतिरेकी वापर होत असल्याचे आढळून आले आहे. जीएचा वापर पुढीलप्रमाणे करतात. 

प्राथमिक वाढीसाठी वापर- 
जीएचा वापर हा पाकळ्यांमधील अंतर वाढविण्यासाठी घडाच्या प्राथमिक अवस्थेत म्हणजे "प्रीब्लूम' अवस्थेत केला जातो. जीएचा हा वापर सर्वच प्रकारच्या द्राक्ष उत्पादनांमध्ये केला जातो. 

नियोजन- 
1) घडांचा रंग पोपटी हिरवा म्हणजे साधारणतः 7 पानांच्या अवस्थेमध्ये किंवा घडाचा आकार साधारणतः एक इंच असताना 10 पीपीएम जीएची फवारणी करावी. 2) दुसरी फवारणी 15 पीपीएमची 3 ते 4 दिवसांनंतर घ्यावी. 3) फवारणीपूर्वी फुटींची विरळणी करावी. 4) फवारणीसाठी 500 ते 600 लिटर फवारणीचे द्रावण एक एकरासाठी वापरावे. गरज भासल्यास दुसऱ्या फवारणी/डीपनंतर 20 पीपीएम जीएचा वापर 3-4 दिवसांनी करावा. त्यामुळे पाकळ्यांची लांबी वाढून घड मोकळा होण्यास मदत होते. 

दक्षता 
1) घड पोपटी रंगाच्या अवस्थेमध्ये असताना जीएच्या द्रावणात घड ताणले गेल्यामुळे घड मोडण्याची किंवा तुटण्याची शक्‍यता असतो.
2) सीसीसी व 6-बी.ए.ची 3 पानांच्या अवस्थेत फवारणी केल्यानंतर लगेच जी.ए.ची फवारणी करू नये. असे केल्यास घड पिवळसर व देठ पांढरे पडून घडांची विकृत वाढ होते. घडांचे मुख्य देठ वाकडे होतात.
3) ढगाळ हवामान असल्यास जी.ए.ची फवारणी करू नये. हवा कोरडी असताना फवारणी करावी. तसेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वाढत असल्याने या फवारणीअगोदर "डाऊनी'साठी प्रतिबंधक फवारणी करणे आवश्‍यक असते. या वेळी डाऊनीपासून घड मुक्त राहातो. यासाठी जीएसोबत बुरशीनाशकांचा वापर करावा.
4) या अवस्थेत जी.ए.चा जास्त प्रमाणात वापर टाळावा. जी.ए.च्या जास्त वापरामुळे घडाचे व पाकळ्यांचे देठ जाड व कडक होतात. देठ शेंड्याकडे चपटे झालेले आढळून येतात. घड उन्हात असल्यास देठ लाल पडण्याची शक्‍यता असते. तर सावलीतील घड पूर्णपणे गळू शकतात.
5) जीएची फवारणी शक्‍यतो सकाळच्या वेळी करावी. त्यामुळे चांगला परिणाम होतो. साधारणपणे सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत फवारणी किंवा डिपिंग करावे. नंतर 3 ते 5 वाजेपर्यंत संध्याकाळी परत फवारणी/डीप देण्यात यावे. 
6) या वर्षी घड जिरण्याचे प्रकार बऱ्याच बागांत दिसत आहेत. हे प्रामुख्याने एप्रिल छाटणीनंतरची सूक्ष्म घडनिर्मिती व्यवस्थित झाली नसल्यामुळे घडले आहे. बऱ्याच बागांत घड कमजोर दिसत आहेत. अशा बागांत वरीलप्रमाणे जीएचा वापर न करता 10 पीपीएमच्याऐवजी 5 पीपीएम जीएचे प्रमाण वापरावे. तसेच पुढच्या अवस्थेतसुद्धा कमी प्रमाणातच जीए द्यावे. एखादा घड स्थिरावल्यानंतर फुलोरा अवस्थेत पाकळ्यांची वाढ जास्त झाली नसल्यास 30 पीपीएम जीए द्यावा. हे सगळे घडाची वाढीची अवस्था बघून करावे; अन्यथा घडात सुधारणा होण्याऐवजी घड जास्त जिरलेले दिसतील. 

मणी व फूलगळसाठी वापर 
अनेक वर्षांपासून जीएचा वापर विरळणीसाठी होत आहे. जीएच्या वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढून मण्यांमधील अंतर वाढते आणि फूलगळ होऊन पुढील विरळणी करणे शक्‍य होते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथील संशोधनात असे आढळून आले आहे, की जीएमुळे घडांची व पाकळ्यांची लांबी वाढते, परंतु अपेक्षेप्रमाणे मणीगळ होत नाही. त्यासाठी जीए व्यतिरिक्त कार्बारिल 1000 पीपीएमचा वापर केला जातो. परंतु ढगाळ वातावरण असेल किंवा कार्बारिलचा जास्त प्रमाणातील वापर टाळावा अन्यथा पूर्ण घड झडून घडाचा सांगाडा तेवढा वेलीवर राहील. याशिवाय मण्यांची संख्या कात्रीच्या साहाय्याने कमी करणे आवश्‍यक असते. 

नियोजन 
1) मणीगळ करण्यासाठी 50 टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत 20 पीपीएम ते 40 पीपीएम जीएच्या द्रावणात घड बुडवणी करावी.
2) फुलोरा अवस्थेमध्ये 40 ते 60 दिवसांच्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण द्यावा. 

दक्षता 
1) पूर्ण फुलोरा ते 3-4 मिमी अवस्थेच्या काळात जीएचा वापर करू नये. यामुळे विरळणी न होता "शॉट बेरीज'चे प्रमाण वाढते.
2) जीएसोबत कार्बारीलची फवारणी करू नये. तसेच पाण्याचा ताण जास्त दिला असल्यास कार्बारिल वापरण्याचे टाळावे.
3) विरळीसाठी ढगाळ हवामानात जीएची फवारणी करू नये.
4) कॅनॉपी (विस्तार) जास्त असेल व घड सावलीत असतील, तर फवारणी घेऊ नये. 

विरळणीच्या मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढे किंवा वितभर लांबी ठेवून शेंडा खुडावा. कात्रीच्या साह्याने विरळणी करताना घडातील पहिल्या तीन पाकळ्या राखून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी इ. या क्रमाने घडातील पाकळ्या, मण्यांचा आकार 2-3 मिमी व्यासाचा असताना काढाव्यात. बऱ्याच बागांमध्ये घडाच्या वरच्या बाजूचे मणी आकाराने लहान राहिल्याचे दिसून आले आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे वरील मणी हे संजीवकांच्या द्रावणात बुडविले जात नाहीत. ते व्यवस्थित बुडविले न गेल्यामुळे आकाराने लहान राहतात. यासाठी वरील तीन पाकळ्या काढून टाकून नंतरच्या 2-3 पाकळ्या ठेवून त्यानंतर अल्टरनेट पाकळ्या घडावर ठेवून बाकीच्या पाकळ्या काढून टाकाव्यात. साधारणतः 10-12 पाकळ्या प्रत्येक घडावर ठेवाव्यात व प्रत्येक पाकळीवर 10 मणी ठेवल्यास 100-120 मण्यांची संख्या लक्षात घेऊन "थिनिंग'ची मर्यादा ठरवावी. अशा प्रकारे प्रत्येक घडावर 100-120 मणी राहतील व घड सुटसुटीत/मोकळा होईल. 

मणी वाढीसाठी वापर- 
मण्यांचा आकार व वजन वाढविण्यासाठी संजीवकांचा वापर करण्यात येतो. यात जीएबरोबर 6 बीए, 4 सीपीए, सीपीपीयू, ब्रासिनोस्टिरॉईड किंवा फक्त जीए देण्यात येते. द्राक्ष मण्यांच्या फुगवणीसाठी 4 मिमी मणी आकार असताना जीएचे पहिले डिपिंग देणे फायद्याचे ठरते. यासाठी 40 पीपीएम जीएसोबत 2 पीपीएम सीपीपीयू घ्यावे. परंतु सीपीपीयूचा वापर करताना घडाच्या पोषणासाठी काडीवर कमीतकमी 15 पाने असावीत. दुसरा डीप (6 ते 7 मि.मी. अवस्थेमध्ये) देताना फक्त जीए 30 पीपीएम मात्रेत घ्यावे. सीपीयूचा वापर पानांची संख्या घडाच्या पुढे 10-12 इतकी असेल तरच करावा. पाने कमी असल्यास ब्रासिनोस्टेराईड्‌स किंवा 6 बीए, सीपीपीयूऐवजी वापरावे. स्थानिक बाजारपेठेसाठी 6 बीए व जीएचा वापर वरील दोन्ही अवस्थेत करावा.
1) घडाच्या अवस्थांचे काटेकोरपणे पालन करावे व वरीलप्रमाणे जीएचे प्रमाण घ्यावे. 
2) द्रावणाचा सामू कमी करण्यासाठी सायट्रिक ऍसिडचा वापर करावा.
3) जीएसोबत बुरशीनाशकांचा वापर करणे शक्‍य असते. पहिल्या डीपसोबत डाऊनीसाठी "ऍलिएट' किंवा फॉस्फोनिक ऍसिडचे क्षार वापरावे. दुसऱ्या डीपसोबत भुरीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरावे. 
4) दुसरा डीप देण्यापूर्वी मण्यांची विरळणी पूर्ण करावी. 

दक्षता 
1) फुगवणीसाठी दोनदाच डीप घ्यावा. जीएचा अतिरेक करू नये. 
2) जीएसोबत एकापेक्षा अधिक संजीवके मिसळू नयेत. 
3) जीएचा वापर खूप उशिरा केल्यास मण्यांच्या पक्वतेचा काळ वाढतो. गोडी कमी राहून द्राक्षे तुरट लागतात. मण्यांचे ब्रुझिंग वाढते व घड काळपट दिसतात. मणी कुजण्यास सुरवात होते. 

मण्यांचा कुरकुरीतपणा वाढविण्यासाठी मण्यांमधील गराचे प्रमाण जास्त असावे. मण्यांमधील गराचे प्रमाण हे त्या वेलीवर असलेल्या घडाच्या काडीवरील पानांच्या संख्येवर अवलंबून असते. जीएच्या वापरामुळे अन्नद्रव्यांचे वहन मण्यांकडे होते व मण्यांचा कुरकुरीतपणा वाढतो. मण्यांचा कुरकुरीतपणा वाढविणारे घटक असे आहेत. 
1) पानांच्या संख्येनुसार घडात मण्यांची संख्या
2) संजीवकांचा योग्य प्रमाणातील वापर
3) रंगीत जातीमध्ये एकसारखा रंग येण्यासाठी इथिलीन या संजीवकांचा वापर. 
साठवणूकीतील आयुष्य वाढविण्यासाठी 

मण्याची देठाशी पकड घट्ट नसल्याने वाहतूक आणि साठवणुकीत मणीगळ होते. वाढीच्या प्राथमिक अवस्थेपासून दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संजीवकांचे यामध्ये योगदान असते. जीएच्या वापरामुळे देठाची जाडी वाढते व त्यामुळे साठवणीतील आयुष्य वाढवण्यास मदत होते. मण्याची गळ ही दोन प्रकारे होते. 
1) ओली गळ 
2) शुष्क गळ.
संजीवकांच्या वापरामुळे गळ कमी करता येते. ओली गळ होऊ नये म्हणून 50 पीपीएम "एनएए' ची फवारणी काढणीच्या 10 दिवस अगोदर करावी. शुष्क गळ थांबविण्यासाठी देठाची जाडी वाढविणे गरजेचे आहे. हे सीपीपीयू किंवा तत्सम संजीवकांच्या वापरामुळे देठाची जाडी वाढविता येते व मणीगळ कमी करण्यास मदत होते.
3) द्राक्षमणी तजेलदार दिसण्यासाठी कॅल्शिअम नायट्रेटचा वापर 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात 75 ते 105 दिवसांदरम्यान फक्त एकदाच करावा.
(Source : NRC Grapes Pune.)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट