किटक नाशकांचे अवशेष राहू नये यासाठी

*कीडनाशकांचे अवशेष राहू नयेत यासाठी...

युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता बागायतदारांनी खालील बाबींची पूर्तता व नियोजन करणे आवश्‍यक आहे

१) नोंदणीकृत निर्यातक्षम द्राक्ष बागेचे नूतनीकरण ३० नोव्हेंबर २०१० पूर्वी करून घेणे.

२) नव्याने द्राक्ष बागेची नोंदणी करण्याकरिता विहित प्रपत्रात (प्रपत्र-२) मध्ये अर्ज व सोबत सात-बारा व फी भरून संबंधित नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०१० पूर्वी अर्ज करणे.

३) निर्यातक्षम द्राक्ष बागेचे नोंदणी प्रमाणपत्र संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडून प्राप्त करून घेणे. नोंदणी प्रमाणपत्र नमूद करण्यात आलेल्या सूचनांचे अनुपालन करणे व योग्य ते रेकॉर्ड ठेवणे. 

४) निर्यातक्षम द्राक्ष बागांची संबंधित तपासणी अधिकाऱ्याकडून तपासणी करून घेणे व तपासणी अहवाल प्राप्त करून घेणे.

५) द्राक्षावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या कीडनाशकांची (पेस्टिसाईड्‌स) नोंद प्रपत्र-३ मध्ये ठेवून रेकॉर्ड तपासणी अधिकाऱ्याकडून साक्षांकित करून घेणे.

६) निर्यातक्षम द्राक्ष बागेचा नकाशा व बागेची ओळख दर्शविणारा फलक लावणे आवश्‍यक आहे.

*युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांना कीडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांनी खालील बाबींची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

१) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी द्राक्षावरील किडी व रोगांच्या नियंत्रणाकरिता कीडनाशक उर्वरित अंश योजनेअंतर्गत प्रपत्र ५ मध्ये निर्धारित केलेल्या कीडनाशकांचीच फवारणी करणे.

२) एकाच कीडनाशकाचा सलग वापर न करणे.

३) द्राक्षे काढण्यापूर्वी ३० दिवस आधी कीडनाशकांची फवारणी न करणे, गरज पडल्यास जैविक कीडनाशके वा कमी विषारी कीडनाशकांचा वापर करणे. वापरण्यात आलेल्या कीडनाशकांची नोंद रेकॉर्ड वहीमध्ये ठेवणे.

४) प्रत्येक कीडनाशकाचे पीएचआय (काढणीपूर्व प्रतीक्षा काळ) केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडे नोंदणीच्या वेळी मंजूर केलेला असतो. त्याची माहिती पत्रकात दिलेली असते. त्याप्रमाणे कीडनाशकाची निवड करून फवारणी करणे.

५) रासायनिक कीडनाशकांचा गरजेनुसार वापर करणे व जैविक घटकांचा जास्तीत जास्त वापर करणे.

६) बंदी वा प्रतिबंध घातलेल्या कीडनाशकांचा तसेच शिफारस न केलेल्या कीडनाशकांचा वापर न करणे.

७) द्राक्षाची गुणवत्ता राखण्यासाठी व प्रभावी नियंत्रण होण्याच्या दृष्टीने किडी व रोगांचे प्राथमिक अवस्थेत असतानाच नियंत्रण करणे.

८) फवारणी करण्यात आलेल्या सर्व कीडनाशकांची माहिती प्रपत्र-२मध्ये विहित केल्यानुसार अद्ययावत ठेवणे. जेणेकरून उर्वरित अंश संदर्भात अडचणी आल्यास त्याचा उपयोग होतो.

*द्राक्ष निर्यातदारांनी युरोपीय देशांना द्राक्षाची निर्यात सुरू करण्यापूर्वी खालील माहिती करून घेणे आवश्‍यक आहे.

१) युरोपीय देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरिता नोंदणीकृत द्राक्ष बागायतदारांची निवड करून त्यांच्याकडे द्राक्ष बागेची सर्व कागदपत्रे आल्याची खात्री करून घेणे. (नोंदणी प्रमाणपत्र, कीडनाशकांचे रेकॉर्ड, तपासणी अहवाल (४ब).

२) ज्या देशांना द्राक्षाची निर्यात करावयाची आहे त्या देशातील आयातदाराकडून द्राक्षाची गुणवत्ता, प्रतवारी, पॅकिंग, उर्वरित अंश व इतर आवश्‍यक बाबींची माहिती उपलब्ध करून घेणे तसेच आयातदारासमवेत करार करणे.

३) द्राक्षाचे पॅकिंग, ग्रेडिंग, प्री-कुलिंगकरिता अपेडा संस्थेकडून सुविधा प्रमाणित करून घेणे.

४) द्राक्षाच्या निर्यातीकरिता स्टफिंगसाठी सेंट्रल एक्‍साईज विभागाकडून परवानगी घेणे. स्वतःच्या सुविधा नसल्यास ज्यांच्याकडे सुविधा आहेत त्यांच्याशी करार करून संमतिपत्र घेणे.

५) उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता अपेडाने प्राधिकृत केलेल्या कीडनाशक उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेद्वारे द्राक्षाचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करून घेणे.

६) ऍगमार्क प्रमाणीकरणाकरिता डायरेक्‍टोरेट ऑफ मार्केटिंग अँड इन्स्पेक्‍शन, मुंबई यांच्याकडून निर्यातदाराच्या नावाने सर्टिफिकेट ऑफ ऍक्रीडेशन (उअ) घेणे.

७) अपेडा प्राधिकृत उर्वरित अंश प्रयोगशाळेकडून ऍगमार्क ग्रेडिंगचे ऑनलाईनद्वारे प्रमाणपत्र मिळण्यासाठी ग्रेपनेटद्वारे प्रस्ताव पाठविणे आवश्‍यक आहे.

८) बारकोडिंगकरिता जीएस-१ कडे नोंदणी करणे.

९) निर्यातक्षम द्राक्षाची पॅलेट बनविण्याकरिता लाकडाचे पॅलेटचा वापर केला जातो.
लाकडाच्या पॅलेटकरिता इंटरनॅशनल स्टॅंडर्ड फॉर फायटोसॅनेटरी मेसर्स (खडझच-१५) अन्वये केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या पेस्ट कंट्रोल फ्युमिगेटर्सकडून लाकडी पॅलेटचे धुरीकरण करून घेऊन त्यावर स्टॅंप मारून घेणे आवश्‍यक आहे. धुरीकरणाकरिता केंद्र शासनाने राज्यातील २१ पेस्ट कंट्रोल ऑपरेटरना मान्यता दिलेली आहे.

१०) युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ग्रेपनेटद्वारे ऑनलाइन फायटोचे प्रमाणपत्र देण्यासाठी संचालक, कृषी प्रक्रिया व नियोजन विभाग, कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११ ००५ यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नाशिक, सोलापूर व सांगली यांच्या कार्यालयातील कृषी उपसंचालक व कृषी अधिकारी यांना "फायटोसॅनेटरी इश्‍युईंग ऍथॉरिटी' म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यांच्याकडून युरोपीय देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ऑनलाईनद्वारे फायटोसॅनेटरी प्रमाणपत्र दिले जाते.

श्री. हांडे, ९४२३५७५९५६
(लेखक कृषी प्रक्रिया व नियोजन विभागांतर्गत कीड-रोगमुक्त प्रमाणीकरण तपासणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट